Sunday, February 16, 2020

अंगण(चाल:-अरे संसार संसार)

माझ्या अंगणात बाई कैवल्याची भरली विहीर
रहाट ग सोऽहं चाले आनंदाचे त्याला नीर ||

विवेकाच्या वैराग्याच्या हाती रहाट सर्वकाळ
शुद्धप्रेमे दोरी धरी आवाजाचा नाही घोळ ||

सान थोर अवकाश लावी पात्रे रहाटाला 
येवो कोणी कैसा जीव नीर आनंदाने त्याला ||

त्याच पाणियाने सडा नित्य घाली अंगणात
गुरुबोध रांगोळी ग, त्रिगुण नक्षी ही शोभत ||

भावभक्ति हळदी कुंकू गुरुकृपे घाली वरी
पाहता या अंगणास चारी मुक्ति येती द्वारी ||

यमनियम पायरीवरी बसा निवांत टेकून
आसन ही स्थिर होई हाती येई मनप्राण ||

प्रत्याहार सहज होई अंगणास पाहताना
धारणेचा शीण नाही लागे तनमना ||

समाधित उत्थानाचे वर्म हाती सहज पडे
उन्मनीत सहज पहुडे पाहतां अंगणाचे सडे ||

आकाशाचे अंगण ग गुरुकृपेने मिळाले
चारी देह अंगणात नाही बाहेर आतुले ||

गुरुकृपेच्या ग लहरी तो मी तो मी सुगंधित
अंगणात वायुरूपे सर्वकाळ नित्य वहात ||

ऐशा अंगणी बैसावे दास सांगे वारंवार
गुरुकृपेचे अंगण कैवल्याने भरली विहिर ||

नाही जरी जपतप अंगणी या बैसताच
कोणी कैसा येवो जीव अंगण ग होई त्याच ||

ऐसे सद्गुरू ग बोले दासा आंत राहोनिया
दासपणा मुक्त केले अंगणी या व्यापुनीया ||

कवियत्री:- सुमनताई ताडे

2 comments:

  1. छान आहेत तुमचे मराठी साहित्य..

    ReplyDelete
  2. खूप धन्यवाद आजीची कृपा माझ्या

    ReplyDelete