Sunday, February 23, 2020

आकाशी या विरुनी जाता

आकाशी या विरुनी जाता श्याममूर्ती दिसली |
माझे मला नवल वाटले देहबुद्धी संपली || 1 ||

जिकडे तिकडे संगरहित मी मजमाजी भरले |
भरुनी उरले उरलेही नाही गुरुकृपे कळले || 2 ||

ऐशा भावी विश्वामाजी हळूच संचरले |
गुरुमाऊली संगे राही ब्राह्मनंद उसळे || 3 ||

संगरहित या द्वैताची काय सांगु गोडी |
भक्तिप्रेमे भाव अधिष्ठित दास-गुरू जोडी || 4 ||

पानाफुलांतुनी रसारसांतूनी जोडी खेळते |
पर्वत डोंगर दऱ्या सरिता माझे मीच बघते || 5 ||

चंद्र सूर्य ग्रह तारादिक रूपे माझी महान |
दाही दिशाही मीच व्यापते तेजोमय होऊन || 6 ||

तरुवर  वेली वायूसंगे  आनंदे डुलकी |
सोऽहं सोऽहं गीत तयातुनी माझे मला गाती || 7 ||

अनंत रंगी  होऊनी पक्षी होऊनी  विहरे |
अधिष्ठानी बसूनी पाहते माझे रूप खरे || 8 ||

लहानमोठे पशु होऊनी राही वनमाजी |
गुणी होऊनी नाना  रूपे पाही दुरून आजि || 9 ||

धरणीमाजी अणुरेणुतून संगरहित विचरे |
अफाट सागर होऊनी मिची स्वरूपी नितस्थित रे || 10 ||

अशाच खेळी खेळूनिया श्रीगुरुचरणी राही |
दासाविण ही गुरुमाऊली कुठे कदा न राही || 11 ||



No comments:

Post a Comment