Thursday, March 12, 2020

गा रे गा रे गा गुरुनाम गा

गा रे, गा रे, गा । गुरुनाम गा ।।
नामी रंगता रे । होसी तू असंगा ।। धृ ।।

पाही पाही रे, सारुनी पाहणे ।
नीलवर्णी सर्व होऊनिया जाणे ।
निरंजन ते, नाही अंजनास ।
तेचि तू रे होई, राहुनिया जागा ।।१।।

नाही नाही रे पिंड ब्रह्मांड ।
आहे आहे रे अचल अजोड ।
ठायी तूचि ते रे, व्यापिसी जगा ।।२।।

निर्विकारी तेचि, तया संग नाही ।
कर्तेविण का हे जग झाले पाही ।
गुरुनाम प्रेमे शुद्ध स्फुरण स्फुरे गा ।।३।।

गात गात दास, स्फुरणच होई ।
स्फूरणी आनंद, सांगू कुणा काही ।
आनंद स्फुरणी, दास हा निःसंगा ।
स्वरूपानंदी मिळे गा, स्फुरणी मिळे गा ।।४।।

गा रे गा रे गा । गुरुनाम गा ।।

Sunday, February 23, 2020

आकाशी या विरुनी जाता

आकाशी या विरुनी जाता श्याममूर्ती दिसली |
माझे मला नवल वाटले देहबुद्धी संपली || 1 ||

जिकडे तिकडे संगरहित मी मजमाजी भरले |
भरुनी उरले उरलेही नाही गुरुकृपे कळले || 2 ||

ऐशा भावी विश्वामाजी हळूच संचरले |
गुरुमाऊली संगे राही ब्राह्मनंद उसळे || 3 ||

संगरहित या द्वैताची काय सांगु गोडी |
भक्तिप्रेमे भाव अधिष्ठित दास-गुरू जोडी || 4 ||

पानाफुलांतुनी रसारसांतूनी जोडी खेळते |
पर्वत डोंगर दऱ्या सरिता माझे मीच बघते || 5 ||

चंद्र सूर्य ग्रह तारादिक रूपे माझी महान |
दाही दिशाही मीच व्यापते तेजोमय होऊन || 6 ||

तरुवर  वेली वायूसंगे  आनंदे डुलकी |
सोऽहं सोऽहं गीत तयातुनी माझे मला गाती || 7 ||

अनंत रंगी  होऊनी पक्षी होऊनी  विहरे |
अधिष्ठानी बसूनी पाहते माझे रूप खरे || 8 ||

लहानमोठे पशु होऊनी राही वनमाजी |
गुणी होऊनी नाना  रूपे पाही दुरून आजि || 9 ||

धरणीमाजी अणुरेणुतून संगरहित विचरे |
अफाट सागर होऊनी मिची स्वरूपी नितस्थित रे || 10 ||

अशाच खेळी खेळूनिया श्रीगुरुचरणी राही |
दासाविण ही गुरुमाऊली कुठे कदा न राही || 11 ||



Saturday, February 22, 2020

पोवाडा

धन्य धन्य सद्गुरुराव
ऐसा नवलाव केला ज्यानं
त्याचं नावच करुणाघन जी जी जी .... ||

देह पायी जिव गुंतला मोहे भुलला पसारा केला
कष्टी बहू झाला जन्मभरी
त्याचं दुःख पाहूनी दारुण जी जी जी... ||

वैकुंठ सोडलं त्यानंत भक्ता कारण
झाला सगुण गेला विसरून निजरूपा
त्याचं वेदच करी गुणगान जी जी जी... ||

अक्षय खरा अव्यय असे निर्भर
नाही भावभय देई नीज ठाय चारणासी
त्यानं घातलं डोळा अंजन जी जी जी... ||

दावी वाट मनपवनाची निर्मल साची
खऱ्या मोक्षाची नाही भ्रांतिची नाही भ्रांतिची सावुली रं
करी धरून दाविल गगन जी जी जी... ||

गगनात बैसवी नित्य नाही रे चित्त
जाणिवेचा अंत शांतनिवांत करून ठेल
विश्व नाही तूच चिदघन जी जी जी... ||

त्रिगुणाला हाता तो संग विरहित
कर्मी तू रत कर्मी तू रत घेत नाही
नाही केलं मोक्ष बंधन जी जी जी... ||

आनंद सागर नेलं न्हाऊ घातलं
प्रेमी माखलं वस्त्रे पुशिले अवकाशे
बोध टिळा लावी चंदन जी जी जी... ||

दया क्षमा पुढे चलती गुरू सांगासी
दावी प्रतीती मीच नटलो
त्याचं घेई सदा दर्शन जी जी जी... ||

नाही माया भ्रांतिसी ठाव काम क्रोध वाव
ज्ञानाज्ञान नाव पुसून गेलं
माझा मीच भरलो अणुतून जी जी जी... ||

संपली आता यातायाती
जन्म नाही क्षिती पुन्हा मागुती पुन्हा मागुती
अमर झालो सदगुरु कृपे मीच भरलो
लोका सांगे गर्जुन आता जी जी जी... ||

गर्जुन सांगतो लोका यारे भीऊ नका
दिनाचा सखा घ्यारे तुम्ही सुखा
दास वाटीतो वाटूनी चिदघन जी जी जी...||

त्यानं दिल गगन आंदण केलं रं गगन
सर्व व्यापून निलवर्णानं
दास मोहन दास मोहन गेला रे विरून
दास नाही गुरू परिपूर्ण जी जी जी...||

Friday, February 21, 2020

प्रेमरंग (राग :- पिलू)

विश्वारूपाचा करू नको कंटाळा
त्या रूपे भेटी गोपाळा
तो दाविरे सुलभ स्व स्वरूपाला
सत चित घन भरून तुजला
नाम रूपाने दावि आनंदाला
पाही सोडूनी मी तूं पणाला

चाल      जड जीव निर्मून सारी
             विश्वी खेळे विश्वांतरी
             चैतन्ये विलसे भारी

तुज नेत्र  दिले तेच रूप बघण्याला
नेत्री घालूनी स्वतेजाला || 1 ||

तुज रमविण्या सृष्टी सारी केली
विविध रंगी उधळण झाली
सुगंध पुष्पे बहरून आली
वृक्ष वेली फळे रस भरली
सरीता वाहती निर्झर झुळुझुळु झरणी
गंगेचे सागरी दावी स्वरूप सतत
त्या रूपा नाही रे अंत

चाल   आनंदे पाही हरीला
          अंतर बाह्य जो रंगला
          प्रेम रंगाने भिजवून टाकी त्याला

तुझ्या तूच स्वस्वरूपाला || 2 ||

दऱ्या डोंगरी दावी अचल मीच
तुझ्या ठायी रूप ते तेच
वायू रूपाने जतन करी प्राणाला
जड जीवी जीववी जीवाला
दिले गगन हे नित्य तुला बसण्याला
जा होवूनी नील वर्णाला

चाल   निलवर्णी धाम रेत्याचे
          निरंजन नाम हे त्याचे
          ते तुझ्याच रे सत्तेचे

जा धामी त्या स्मरूनी गुरुचरणाला
मग ठायी तूची धामाला || 3 ||

त्याने खेळाया दिधले तुज हे रूप
निर्मूनी स्वरूपे अमूप
विविध रंगाची पखरण त्याने केली
तुज कळण्या बुद्धिही दिली
प्रेम भराने रूपे पाहण्याला
मन चित्त दिले संगाला

चाल    शुद्ध मी त्याच्या स्फुरणाने
          तुझी स्वरूपे पाही चैतन्ये
          मग आनंदे वन भुवने

नको विसरू रे ऐशा श्रीहरिला
जनी वनी मुकुंद भरला || 4 ||

गुरुनी दासाला दिला बोध अंतरी
पाही सद्गुरू चराचरी
त्रिगुण रूपाने सद्गुरू खेळ खेळी
खेळी होऊनी राही निराळी
दुजे नाही रे तुझेच रूप भरले
आस्ति भाति प्रियरूप सजले

चाल    ही जाणीव दे सोडून
           दासा दाविले तिचे स्थान
          सुख सागरी नीत बुडवून

दास पोहोनी मूळ सागरी बसला
तोचि गोपाळ सांगे तुम्हाला ||
          
           
           

Wednesday, February 19, 2020

रमणी स्वरूपी ज्याचे

रमणे स्वरूपी ज्याचे | दुजे न काही त्याला |
निर्विकार होऊनिया | पाही तो आपणाला || धृ ||

नेत्री उलट होता | गुरुबोध जाण घेता |
विश्वात प्रेम नांदे | आधी कळे तयाला || 1 ||

चैतन्य चित्त सारे | पाहण्यास नाही दुसरे |
माझाच मी मला रे | झालो दुजेपणाला |
आनंद वाटण्याला || 2 ||

जाई तिथे ग दिठी | माझी मलाच भेटी |
आनंदपूर लोटी जीवास तरण्याला || 3 ||

सूर्यास ठाव नाही | कैसा असे तिमिर |
करीतो प्रकाश सारा | किरणात त्याचे |

तैसाच शुद्ध मीचि | व्यापूनी शुद्ध उरला || 4 ||

ऐसा असे ग दास | राही निरंजनात |
ठायी बसूनी पाही | हिंडे जनावनात ||
गुरुमाऊली ग तयाला | सुख देई वाटण्याला |
जीवास तरण्याला || 5 ||


Tuesday, February 18, 2020

घनानंद(चाल :- अरे संसार संसार)

भक्ति अंगणात बाई भाव वेली पसरली
प्रसन्नता पाहुनिया माय गुरू ग बैसली || धृ ||

सांग आत सडा टाकी देह बुद्धि अहंतेचा
कचरा ग जाईल सारा कामक्रोध संकल्पाचा || 1 ||

इंद्रियांच्या पणती लावी विवेकाच्या पायरीवरी
निष्ठेचे ग तेल घाली सोऽहं ज्योती तेवती तरी || 2 ||

रांगोळी ग त्रिगुणांची काढी तन्मय होउनी
वैराग्याचे हळदी कुंकू भरू दे ग फुलपानी || 3 ||

काढी स्वस्तिक दारात माझ्या ठायी मीच स्थिर
चारी देह गोपज्ञेही होईल ग गिरीधर || 4 ||

षडचक्र कमलावरी बैसले ग गुरुराज
त्रिकुटाच्या महालात दावी कैवल्याचे तेज || 5 ||

त्रिकुटाच्या महालाला शुद्ध जाणीव उंबरा
तो मी तो मी जाणिवेने ओलांडूनी येई घरा || 6 ||

महालाच्या शिखरा पाही निल नेत्र करुनिया
निर गगन तूचि अससी तुझा तूचि गुरुराया || 7 ||

शांतीक्षमा दया तुजला घालतील माळा गळा
सहज कर्मे फुले त्यात गंध असे हा आगळा || 8 ||

सप्त भूमिका ही तबके निरंजन त्यात ज्योत
परब्रम्ह साकारूनी ओवाळुनी तुज पाहतो || 9 ||

एक छत्राचे चामर शिरी तुझ्या निरंतर
धरतील गुरुराज सांगे घेऊनी गिरीधर || 10 ||

चारी वेद देह तुझा होईल ग वेदशाळा
नाद ब्रम्ह सनई सूर चालेल ग वेळोवेळां || 11 ||

दशनाद नगारे ही वाजतील निरंतर
ब्रम्हानंद भरुनी राही नाही तया खाली वर || 12 ||

घनानंद वर्षेला ग सरी ना ना अंत पार
आनंदाच्या तुषारांनी जीव होती भावपार || 13 ||

ऐसे दासाला सांगुनी सांगे पुन्हा तोडी घर
अंगणात खेळूनीया नाही खेळी तूचि तर || 14 ||
कवयित्री :- सुमनताई ताडे

Sunday, February 16, 2020

अंगण(चाल:-अरे संसार संसार)

माझ्या अंगणात बाई कैवल्याची भरली विहीर
रहाट ग सोऽहं चाले आनंदाचे त्याला नीर ||

विवेकाच्या वैराग्याच्या हाती रहाट सर्वकाळ
शुद्धप्रेमे दोरी धरी आवाजाचा नाही घोळ ||

सान थोर अवकाश लावी पात्रे रहाटाला 
येवो कोणी कैसा जीव नीर आनंदाने त्याला ||

त्याच पाणियाने सडा नित्य घाली अंगणात
गुरुबोध रांगोळी ग, त्रिगुण नक्षी ही शोभत ||

भावभक्ति हळदी कुंकू गुरुकृपे घाली वरी
पाहता या अंगणास चारी मुक्ति येती द्वारी ||

यमनियम पायरीवरी बसा निवांत टेकून
आसन ही स्थिर होई हाती येई मनप्राण ||

प्रत्याहार सहज होई अंगणास पाहताना
धारणेचा शीण नाही लागे तनमना ||

समाधित उत्थानाचे वर्म हाती सहज पडे
उन्मनीत सहज पहुडे पाहतां अंगणाचे सडे ||

आकाशाचे अंगण ग गुरुकृपेने मिळाले
चारी देह अंगणात नाही बाहेर आतुले ||

गुरुकृपेच्या ग लहरी तो मी तो मी सुगंधित
अंगणात वायुरूपे सर्वकाळ नित्य वहात ||

ऐशा अंगणी बैसावे दास सांगे वारंवार
गुरुकृपेचे अंगण कैवल्याने भरली विहिर ||

नाही जरी जपतप अंगणी या बैसताच
कोणी कैसा येवो जीव अंगण ग होई त्याच ||

ऐसे सद्गुरू ग बोले दासा आंत राहोनिया
दासपणा मुक्त केले अंगणी या व्यापुनीया ||

कवियत्री:- सुमनताई ताडे