Tuesday, February 18, 2020

घनानंद(चाल :- अरे संसार संसार)

भक्ति अंगणात बाई भाव वेली पसरली
प्रसन्नता पाहुनिया माय गुरू ग बैसली || धृ ||

सांग आत सडा टाकी देह बुद्धि अहंतेचा
कचरा ग जाईल सारा कामक्रोध संकल्पाचा || 1 ||

इंद्रियांच्या पणती लावी विवेकाच्या पायरीवरी
निष्ठेचे ग तेल घाली सोऽहं ज्योती तेवती तरी || 2 ||

रांगोळी ग त्रिगुणांची काढी तन्मय होउनी
वैराग्याचे हळदी कुंकू भरू दे ग फुलपानी || 3 ||

काढी स्वस्तिक दारात माझ्या ठायी मीच स्थिर
चारी देह गोपज्ञेही होईल ग गिरीधर || 4 ||

षडचक्र कमलावरी बैसले ग गुरुराज
त्रिकुटाच्या महालात दावी कैवल्याचे तेज || 5 ||

त्रिकुटाच्या महालाला शुद्ध जाणीव उंबरा
तो मी तो मी जाणिवेने ओलांडूनी येई घरा || 6 ||

महालाच्या शिखरा पाही निल नेत्र करुनिया
निर गगन तूचि अससी तुझा तूचि गुरुराया || 7 ||

शांतीक्षमा दया तुजला घालतील माळा गळा
सहज कर्मे फुले त्यात गंध असे हा आगळा || 8 ||

सप्त भूमिका ही तबके निरंजन त्यात ज्योत
परब्रम्ह साकारूनी ओवाळुनी तुज पाहतो || 9 ||

एक छत्राचे चामर शिरी तुझ्या निरंतर
धरतील गुरुराज सांगे घेऊनी गिरीधर || 10 ||

चारी वेद देह तुझा होईल ग वेदशाळा
नाद ब्रम्ह सनई सूर चालेल ग वेळोवेळां || 11 ||

दशनाद नगारे ही वाजतील निरंतर
ब्रम्हानंद भरुनी राही नाही तया खाली वर || 12 ||

घनानंद वर्षेला ग सरी ना ना अंत पार
आनंदाच्या तुषारांनी जीव होती भावपार || 13 ||

ऐसे दासाला सांगुनी सांगे पुन्हा तोडी घर
अंगणात खेळूनीया नाही खेळी तूचि तर || 14 ||
कवयित्री :- सुमनताई ताडे

No comments:

Post a Comment