Thursday, March 12, 2020

गा रे गा रे गा गुरुनाम गा

गा रे, गा रे, गा । गुरुनाम गा ।।
नामी रंगता रे । होसी तू असंगा ।। धृ ।।

पाही पाही रे, सारुनी पाहणे ।
नीलवर्णी सर्व होऊनिया जाणे ।
निरंजन ते, नाही अंजनास ।
तेचि तू रे होई, राहुनिया जागा ।।१।।

नाही नाही रे पिंड ब्रह्मांड ।
आहे आहे रे अचल अजोड ।
ठायी तूचि ते रे, व्यापिसी जगा ।।२।।

निर्विकारी तेचि, तया संग नाही ।
कर्तेविण का हे जग झाले पाही ।
गुरुनाम प्रेमे शुद्ध स्फुरण स्फुरे गा ।।३।।

गात गात दास, स्फुरणच होई ।
स्फूरणी आनंद, सांगू कुणा काही ।
आनंद स्फुरणी, दास हा निःसंगा ।
स्वरूपानंदी मिळे गा, स्फुरणी मिळे गा ।।४।।

गा रे गा रे गा । गुरुनाम गा ।।