Friday, February 21, 2020

प्रेमरंग (राग :- पिलू)

विश्वारूपाचा करू नको कंटाळा
त्या रूपे भेटी गोपाळा
तो दाविरे सुलभ स्व स्वरूपाला
सत चित घन भरून तुजला
नाम रूपाने दावि आनंदाला
पाही सोडूनी मी तूं पणाला

चाल      जड जीव निर्मून सारी
             विश्वी खेळे विश्वांतरी
             चैतन्ये विलसे भारी

तुज नेत्र  दिले तेच रूप बघण्याला
नेत्री घालूनी स्वतेजाला || 1 ||

तुज रमविण्या सृष्टी सारी केली
विविध रंगी उधळण झाली
सुगंध पुष्पे बहरून आली
वृक्ष वेली फळे रस भरली
सरीता वाहती निर्झर झुळुझुळु झरणी
गंगेचे सागरी दावी स्वरूप सतत
त्या रूपा नाही रे अंत

चाल   आनंदे पाही हरीला
          अंतर बाह्य जो रंगला
          प्रेम रंगाने भिजवून टाकी त्याला

तुझ्या तूच स्वस्वरूपाला || 2 ||

दऱ्या डोंगरी दावी अचल मीच
तुझ्या ठायी रूप ते तेच
वायू रूपाने जतन करी प्राणाला
जड जीवी जीववी जीवाला
दिले गगन हे नित्य तुला बसण्याला
जा होवूनी नील वर्णाला

चाल   निलवर्णी धाम रेत्याचे
          निरंजन नाम हे त्याचे
          ते तुझ्याच रे सत्तेचे

जा धामी त्या स्मरूनी गुरुचरणाला
मग ठायी तूची धामाला || 3 ||

त्याने खेळाया दिधले तुज हे रूप
निर्मूनी स्वरूपे अमूप
विविध रंगाची पखरण त्याने केली
तुज कळण्या बुद्धिही दिली
प्रेम भराने रूपे पाहण्याला
मन चित्त दिले संगाला

चाल    शुद्ध मी त्याच्या स्फुरणाने
          तुझी स्वरूपे पाही चैतन्ये
          मग आनंदे वन भुवने

नको विसरू रे ऐशा श्रीहरिला
जनी वनी मुकुंद भरला || 4 ||

गुरुनी दासाला दिला बोध अंतरी
पाही सद्गुरू चराचरी
त्रिगुण रूपाने सद्गुरू खेळ खेळी
खेळी होऊनी राही निराळी
दुजे नाही रे तुझेच रूप भरले
आस्ति भाति प्रियरूप सजले

चाल    ही जाणीव दे सोडून
           दासा दाविले तिचे स्थान
          सुख सागरी नीत बुडवून

दास पोहोनी मूळ सागरी बसला
तोचि गोपाळ सांगे तुम्हाला ||
          
           
           

No comments:

Post a Comment