Sunday, February 16, 2020

सोडी सोडी तू 'मी' ला मना रे

सोडी सोडी तू | 'मी' ला मना रे || धृ ||

मिथ्या 'मी' ला का रे धरीसी | 'माझे' म्हणूनी जन्म घेसी |
शरण जाऊनी सद्गुरुसी | करी नित नाही तिला || 1 ||

'मी, मी' वृत्ती उठते कोठून | जाई त्वरेने पाही वळून |
मागे वळता वृत्ती नाही | अससी तूचि सत रुपाला || 2 ||

प्राणांपानी वृत्ती लावी | सोऽहं म्हणूनी गगन आटवी |
गगन नसता जे रे उरते | पाही पाही त्याला || 3 ||

पाहता गगन उठता वृत्ती | श्वासावरती येई मागुती |
घेऊनी तिजला श्वासंगे | दावी निल वर्णाला || 4 ||

करी रात्रंदिन या सेवेला | मीचि भरलो, ना संगला |
प्रेमभराने पाही जगाला | नाही दुसरा झाला || 5 ||

ऐसे 'मी' चे स्फुरण होता | साक्षीविण गुरू परता |
त्या स्थानीचा दास हा असता | वृत्तीच नाही त्याला || 6 ||
कवयित्री :- सुमनताई ताडे

संग तुला ब्रम्हाचा

संग तुला ब्रम्हाचा | मुळी ब्रम्ह तूही साचा || धृ ||
नाही नाही मन | पंचभूतासी तू कारण ||
साक्षी अससी | सर्व जीवांचा || 1 ||

येसी आकारा | घेसी विकारा |
तूचि नटसी करुनी पसारा ||
सद्गुरुकृपे पाहसी जरी तू |
साक्षी नि:संगचा || 2 ||

अनंत असशी अनंत होशी |
नामरूपाविण असंग राहसी ||
शुद्ध जाणिव नाही होता |
पालव तू गगनाचा || 3 ||

नाना रूपे नाना रंग |
शुद्ध प्रेमे खेळी दंग ||
एक न गमते द्वैत होसी |
निर्गुण तू मुळीचा || 4 ||

कैवल्याची प्रेमळ मूर्ती |
सद्गुरू तूचि तूचि शांति ||
शांति आकारा येऊनि आता |
धारिते कर दासाचा || 5 ||
कवियत्री :- सुमनताई ताडे

सांगू कसे ग कधी कुणाला

सांगू कसे ग कधी कुणाला | माझी मी रमले |
पाहुनी माझे विश्वरूप हे | धुंदचि मी झाले || 1 ||

गुरुकृपेने व्यापक होवून | एकेदेशी गेले |
'मी' पण नाही 'तू' पण कैचे | अतीत हे केले || 2 ||

चारी देह सांडूनी सगळे | शुद्ध जनिवस्वरूप जाहले |
चराचराच्या अवकाशी त्या | स्वरूप ते असले || 3 ||

सुवर्ण कांति नाही वेगळी | कठिणता ही त्यातच असली |
नाही भिन्नता काढू येता | एकातच सगळे || 4 ||

सुगंध पुष्पी रंगही त्यात | नाही भिन्नता त्या सर्वांत ||
तैसे जग हे स्फुरण आत | द्वैतचि ना झाले || 5 ||

प्रेमभराने मीच खेळते | सद्गुरूअंकावरी बैसते ||
गुरुकृपेचे एक छत्र ते | पालव मज झाले || 6 ||

माझे मीच मला पाहणे | तिथेच ग संपले |
दास हा गुरुचरणी लोळे || 7 ||
कवियत्री :- सुमनताई ताडे

Friday, February 14, 2020

मंथन

राधा रमली भान विसरली कृष्ण आला धावूनी
रिताच डेरा घुसळत होती कृष्ण कृष्ण म्हणूनी || धृ ||

रिताच डेरा पाहुनी तो हा कृष्ण मनी हसला
लहान होवूनी भक्तीसाठी डेऱ्यातच बसला
बसूनी आत मंथन करितो राधाकृष्ण म्हणून
नवल जाहले डेरा भरला राधा पाही वरून || 1 ||

देह डेरा रिताच असता मंथन करी आतून
बुद्धि राधा हळूच पाहे रूप तिचे निरखून || 2 ||

मन बुद्धीचे मंथन होता भक्ति नवनीत आले
वृत्ति गोपिका भाव गोप ते सर्व तृप्त झाले
आतून बाहेर येता कृष्ण तेजोमय हे झाले
कोण राधा कोण कृष्ण भानच नच उरले || 3 ||

नूरल्या भावी दासही असतो आनंदाने खेळ खेळतो
भक्तिरसाचे लोणी खावूनी विश्वी डेऱ्यानचि हा असतो
असतो नसतो जगा भासतो
निर अवकाशी स्वरूपी बसतो || 4 ||
लेखन :- सुमनताई ताडे

Tuesday, February 11, 2020

हा खेळ रे मनाचा

हा खेळ रे मनाचा , ब्रम्हात नाही साचा |
शुद्ध स्वरूप ज्याचे, नाही तिथे रे वाचा || धृ ||

ब्रम्हाहुनी ही काही, जगती दुजे न काही |
सत चित घन आनंदे, परिपूर्णतेचा || 1 ||

गोडी गुळात सारी, कणी गुळ गोड भारी |
निर्गुण चराचरी, सगुणी आनंद त्याचा || 2 ||

नामरूपाविणेही, त्रिगुणी बनून राही |
गगनासी पालव हा, ना संग त्या नभाचा || 3 ||

घटी मठी अवकाशी, सान थोर या आकाशी |
अस्ति भाति प्रिय रूपे, हा खेळ सर्व त्याचा || 4 ||

गुरू होऊनिया तारी, विश्वी स्वरूपे सारी |
दासपणाने सेवी, आनंद अद्वैताचा || 5 ||

खेळात खेळी दंग, भासोनी हा अभंग |
ब्रम्हात ब्रह्मनंद, हा दास रे मुळीचा || 6 ||

हासत नाचत गात जाई सदगुरुचे गान

हासत नाचत गात जाई सद्गुरुचे गुणगान | नाही चित्ता भवभयबंधा नित्य मुक्ती स्नान || गाई रे...

सद्गुरू माधव, माधव सद्गुरू | भवाब्धिचे सत्य तारी |
बोध शीड नित्य उभारी, फडकवी सोऽहं निशाण ||
नामनौकी बैस निरंतर | सदगुरू माधव धावे सत्वर |
शुद्ध प्रेमे आतबाहेर | करविल तुज भगवान ||१ ||

आनदसागरी न्हाऊ घालील | जाणीवरहित ठेविल निश्चळ |
धाम नजंजन दाविल  विमल | देऊनी ह्रदय आपुले दान ||
सृष्टी सारी करील स्वरुप | तया सुखासी अंत ना माप |
ह्रदयद्वारे घडघडी  प्रेमे | सोडुनी मानामान ||
गाई श्रीगुरूचे गान || 2 ||

गगनी जाई विरल  होऊन | ते ही जाणीव देई |
आत्माराम तोचि मोहन | सडून 'तो मी' चे गुणगान ||
गाई रे सद्गुरू चे गुणगान || 3 ||

देह शिवालय आत्मा शंकर |
इंद्रिय सारी शिवगण सुंदर  | सोऽहं सोऽहं वाहे ह्रदयरुधिर |
श्रवणाविणा ही नाद ऐकता | ठाई तू श्रीमान |
गाई श्रीगुरुचे गान || 4 ||

लेखन:- सुमनताई ताडे

सुखसागर हा भरला, गुरुकृपेने ठायी पहिला

सुखासागर हा भरला |
गुरुकृपेने ठायी पहिला || धृ ||

लहरी आनंद सहज उठती |
तुषारातही सागर भरती |
घडता स्नान, नाही मरण |
नाही चिंतन चित्ताला || 1 ||

शांत सागर ठायी असूनी |
त्रिगुण लहरी भास हा नयनी ||
लहरी सागर, उसळत सागर |
नाही परी अंताला || 2 ||

मेघ होऊनी करी वर्षाव |
होऊनी मेघ, गगना न ठाव ||
आनंदाच्या जलधारांनी |
भिजवी माझा मीच मला ||
पाहे दुरुनी या दासाला || 3 ||

लेखन:- सुमनताई ताडे